नांदगावला एकाच रात्री सात घरे फोडली
लाखोंचा ऐवज लंपास ; बंद घरांना केले लक्ष्य

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.१३ नांदगाव शहरात गुरुवारी रात्रीत सात ते आठ ठिकाणी घरफोड्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्राने आता विक्राळ रूप घेतले असून,यामुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
नांदगाव शहरातील गुरुकृपा नगर आणि जतपुरा भागात यापूर्वीच धाडसी घरफोड्या घडल्या होत्या.त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री येवला रस्त्यावरील विवेकानंद नगर आणि मल्हारवाडी भागात बंद घरांमध्ये घुसून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे
विशेष म्हणजे,चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बंद दरवाजांचे कोयंडे कापले.दगूबाई आहेर यांच्या घरातून तब्बल १० तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली असल्याची तक्रार दाखल झाली आहे.
याशिवाय निवृत्त पोलिस अधिकारी,शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्या बंद घरांवरही चोरट्यांनी हात साफ केला.विवेकानंद नगर भागातील संतोष जगन्नाथ आहेर,उज्वला राजेंद्र तुपे,जनार्दन आनंदा महाजन,प्रमोद दगडू मराठे,दीपक रावसाहेब निकम आणि सोमनाथ महादेव ठोंबरे यांच्या घरी कोयंडे कापल्याचे निदर्शनास आले.
घरातील कपाटे,पलंग आणि साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले.या घरांतील कुटुंबीय बाहेरगावी गेले होते,याची माहिती आधीच मिळवून ही घरे टार्गेट करण्यात आली असल्याचे दिसते.
@@@@
बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या घराची माहिती शेजाऱ्यांना द्यावी आणि महत्त्वाचा ऐवज सुरक्षित स्थळी ठेवावा. यामुळे अशा घटना टाळता येतील.नांदगाव पोलिसांचा जलदगतीने तपास सुरू असून लवकरच संशयित जेरबंद होतील.
प्रीतम चौधरी,पोलीस निरीक्षक नांदगाव