कसमादेनात घरोघरी चक्रपूजेचा गजर

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज | 26 सप्टेंबर 2025
कसमादे (ता.नांदगाव, जि. नाशिक) –नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील एक खास धार्मिक परंपरा असलेल्या देवीच्या चक्रपूजेचा गजर कसमादे गावात घरोघरी सुरु झाला आहे.शुक्रवार (ता. २६ सप्टेंबर) पासून या पूजेला सुरुवात झाली असून गावभर महिलांची लगबग,मंगलमय वातावरण आणि जयघोषाचा निनाद ऐकायला मिळतोय.

राज्यातील इतर भागांमध्ये फारसा परिचित नसलेला चक्रपूजेचा सोहळा खानदेशात मात्र भक्तीभावाने आणि मोठ्या उत्साहात पार पडतो.पंचमी, सप्तमी,अष्टमी आणि नवमी या चार माळांवर ही पूजा केली जाते. विशेषतः पंचमीचा दिवस अधिक पवित्र मानला जातो.
गावातील पूजेमध्ये “जय अंबे”, “अग्या हो ईश्वराग्या हो” यांसारखे पारंपरिक जयघोष घुमत असतात.अकरा प्रकारचे नैवेद्य अर्पण करून देवीला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.त्यात पुरणपोळी हा खास प्रसाद मानला जातो.
प्रत्येक घरात व गावातील सार्वजनिक देवी मंडळांमार्फतही चक्रपूजा केली जाते आणि प्रसाद वाटप होते.महिलांकडून रांगोळ्या, पूजा साहित्य, सजावट यांची तयारी एक दिवस आधीपासूनच सुरू होते.घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या पूजेत सहभागी होतात.
विशेष बाब म्हणजे जर एका आठवड्यात शुक्रवारी ललिता पंचमी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी नवरात्रातील पंचमी आली, तर पूजेच्या तारखा व वेळांबाबत काहीसा गोंधळ निर्माण होतो.मात्र पुरोहितांच्या मते शुक्रवारच चक्रपूजेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो.

नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील अनेक कुटुंबे सप्तशृंगी गडावर चक्रपूजा करण्यास प्राधान्य देतात. काही घरांमध्ये ही पूजा दिवाळीतल्या नरकचतुर्थीला केली जाते.या निमित्ताने नातेवाईक,भाऊबंद, मित्रमंडळी यांना जेवणासाठी बोलावले जाते.काही गावांमध्ये सामूहिक चक्रपूजाही केली जाते.
या पारंपरिक पूजेमुळे संपूर्ण परिसर भक्तिभावात न्हालेला आहे. दुसरीकडे, गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांनाही ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळतो आहे.




