नादगांव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचे थैमान, शेती पिकाचे मोठे नुकसान
मका,कापूस व कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान; हवामान विभागाचा २९ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता 27 नांदगाव तालुक्यातील गावात शनिवारी (दि. २७) सायंकाळी सुमारे पाच वाजता बाणगाव, मोरझर व आजूबाजूच्या गावात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी आलेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून मका, कापूस आणि कांदा या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून शेतमाल अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे.

हवामान विभागाने २९ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे बळीराजा चिंतेत असून, पुढील पावसामुळे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतांची तात्काळ पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यासोबतच योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी आग्रही मागणी शेतकरी करत आहेत.
—
“मका आणि कापूस पूर्णतः जमीनदोस्त झालेत…”
“माझं व माझ्या भावाचं प्रत्येकी दोन एकर मका पीक पूर्णतः जमीनदोस्त झालं आहे.कापसाच्या शेतातही मोठं नुकसान झालंय.आता शासनाने मदतीचा हात पुढे नसल, तर आमचं उभं आयुष्य संकटात येईल,”
राजेंद्र फणसे (नुकसानग्रस्त शेतकरी, बाणगाव बुद्रुक).




