“अतिवृष्टीच्या तडाख्याने हतबल झालेले शेतकरी; खासदा भास्कर भगरे यांनी दिला धीराचा हात”

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव (प्रतिनिधी):ता. 01 नांदगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या प्रचंड शेती व घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी नुकतीच तालुक्यातील विविध गावांना भेट दिली.नागापूर,पानेवाडी, मोहेगाव, भालुर,लक्ष्मीनगर, मांडवड, मोरझर,पोखरी,जळगाव खुर्द,पिंपरखेड,न्यायडोंगरी,फुलेनगर अशा गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

खासदार भगरे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत आदेश दिले की,
“एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये.सर्वांना न्याय व नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.”
त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक आधार देत सांगितले,”ही आपली चूक नाही,ही निसर्गाची आपत्ती आहे.त्यामुळे खचून न जाता नव्या जोमाने उभे राहा, मी तुमच्या सोबत आहे.”
भालुर येथील एका ७० वर्षीय आजोबांनी मोडून पडलेली मका कणसं आणि खराब झालेली कांदा रोपं हातात घेऊन खासदार भगरे यांना आपली व्यथा मांडली.तर मोहेगाव येथील आदिवासी वस्तीमध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने संसाराची मोठी हानी झाली. भगरे यांनी प्रत्यक्ष वस्तीमध्ये जाऊन पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
लक्ष्मीनगर येथे तर खासदार भगरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश दिला की,”सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा. कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही.”

या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, तहसीलदार सुनील सौंदाणे, गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे, कृषी अधिकारी रवींद्र डमाळे,तलाठी सचिन ढगे,कृषी सहाय्यक रवींद्र आहीरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा धीर आणि आश्वासक भावना निर्माण झाली असून प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे.




