“जैन ट्रस्टच्या जमीन विक्रीविरोधात नांदगावात सकल जैन समाजाचा एल्गार”
नायब तहसीलदारांना निवेदन; विक्री व्यवहार रद्द करण्याची मागणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव (ता. 27) : पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या मालकीच्या तीन एकर जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्रीविरोधात नांदगावातील श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायततर्फे सोमवारी सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.या वेळी नायब तहसीलदार देवेंद्र कु-हे यांना निवेदन देण्यात आले.
महावीर मार्गावरील जैन मंदिरापासून सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ झाला.शनीमंदिर,आहिल्यादेवी होळकर उद्यान,हुतात्मा चौक मार्गे जुन्या तहसील कार्यालयातील पोलीस ठाण्यात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सभेत ज्येष्ठ विधिज्ञ जयकुमार कासलीवाल,सुजाता बडजाते, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड,राजाभाऊ देशमुख,अरुण पाटील,शिवसेना उभाठा गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता आदींनी मनोगत व्यक्त केले.
निवेदनात म्हटले आहे की, सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्तांना खोटी माहिती देत पुणे येथील मॉडेल कॉलनीतील तीन एकर जागा चुकीच्या पद्धतीने विक्री केली. संस्थेच्या इमारतीचे कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट न करता ती मोडकळी दाखवून विक्रीस परवानगी मिळवली. तसेच १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे अस्तित्व नाकारण्यात आले.
या विक्री व्यवहाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही विश्वस्तांनी गोखले बिल्डर्ससोबत खरेदीखत पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार जैन धर्मावर घाला असल्याचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला.
मोर्चात जेष्ठ विधी तज्ञ अॅड. युनुस शेख,डॉ.आनंद पारख,नूतन कासलीवाल रमेश करवा,आनंद कासलीवाल,पत्रकार विजय चोपडा,सुशिल कासलीवाल,दिलीप सेठी,पियुष काला,महावीर पांडे, रमेश करवा,शिवसेनेचे युवा अध्यक्ष सागर हिरे,तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते



