३१ वर्षांनंतर ‘जनता विद्यालय’मांडवडमध्ये माजी विद्यार्थ्यांची भेट
जुन्या आठवणींना उजाळा, स्नेहभोजनात भरला आनंदाचा जल्लोष

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. 28 स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय,मांडवड येथे तब्बल ३१ वर्षांनी १९९३-९४ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला.दिवाळीच्या सुट्टीचा लाभ घेत आपल्या गावी आलेले सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
३१ वर्षांपूर्वीच्या त्या शाळेतील आठवणी सर्वांच्या मनात पुन्हा जाग्या झाल्या. तोच वर्ग, तीच बाकं, तोच फळा आणि तेच शिक्षक — या वातावरणाने सर्वांना बालपणात नेऊन सोडलं. वर्गातील विद्यार्थिनींपैकी अनेकजणी दिवाळीनिमित्त माहेरी आल्याने उपस्थित राहू शकल्या आणि आनंद अधिक वाढला.
सर्वांनी एकत्र शाळेच्या प्रांगणात भेट घेत एकमेकांच्या गप्पा, आठवणी आणि विनोदांत रममाण झाले. “व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज बोलणारे आज प्रत्यक्ष भेटलो,” असं सांगत अनेकजण भावूक झाले. दोन-तीन तास कसे गेले हे कोणालाच कळाले नाही.
कार्यक्रमादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने व्यासपीठावर आपले दिलखुलास मनोगत व्यक्त केले. आज आपण कोणत्या क्षेत्रात आहोत, आयुष्यात किती बदल झाले याची माहितीही सर्वांनी दिली. कार्यक्रमाचा समारोप स्वादिष्ट स्नेहभोजनाने झाला आणि ‘पुन्हा भेटूया’च्या निर्धाराने सर्वांनी निरोप घेतला.
या मेळाव्याचे यशस्वी आयोजन माजी विद्यार्थी भाऊसाहेब रायते, गोरख चोळके, बाबासाहेब थेटे, दीपचंद परदेशी आणि अमोल खोमणे यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा मेळावा संस्मरणीय ठरला.
३१ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा सर्वांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.
!



