“महिलांच्या सक्षमीकरणात ‘एकता ग्राम विकास संस्था’चे योगदान मोलाचे” — राज्य महिला आयोगाच्या नंदिनी आवडे यांचे प्रतिपादन

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
पुणे,ता. ३० ऑक्टोबर :“एकल महिलांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांनी संकटांना न घाबरता स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा. त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या ‘एकता ग्राम विकास संस्थेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे,” असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी आज येथे केले.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय पुणे आणि एकता ग्राम विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एकल महिला हक्क परिषद पुण्यात पार पडली. या परिषदेचे आयोजन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नंदिनी आवडे म्हणाल्या, “या परिषदेमुळे महिलांच्या अनेक समस्यांना आवाज मिळाला आहे. केरळ राज्यात महिलांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणारी प्रणाली आहे. अशीच उपक्रमशील कल्पना महाराष्ट्रात राबविता यावी. एकल महिलांसाठी अभ्यास दौरा आयोजित करावा आणि त्यांच्या समस्यांवर कृती समित्यांद्वारे जनजागृती व्हावी. या क्षेत्रातील अनुभवांचे संकलन करण्याची जबाबदारी ‘एकता’ संस्थेने घ्यावी,” असेही त्या म्हणाल्या.

या वेळी महिला व बालविकास उपायुक्त सुवर्णा पवार यांनी महिलांच्या विकासासाठी विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. महिला बाल विकास सहआयुक्त राहुल मोरे यांनी विभागाच्या विविध उपक्रमांचे सविस्तर विवरण मांडले.
यशदाचे माजी संचालक रवींद्र चव्हाण यांनी परिषदेचे संचालन करताना महिलांच्या सक्षमीकरणातील आपले अनुभव मांडले. पुढील काळात *‘एकता एकल महिला हक्क समिती’*च्या माध्यमातून राज्यभर काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

‘एकता ग्राम विकास संस्था’च्या संचालिका रोहिणी सानप-निंबोरे यांनी सांगितले की, “महिलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी ‘एकता’ संस्थेचा पुढाकार कायम राहील. समाजातील प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा,हेच आमचे ध्येय आहे.”

या परिषदेत राज्यभरातील अनेक महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई आदी जिल्ह्यांमधील महिला कार्यकर्त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले,उपाध्यक्ष मोहन गायकवाड, सचिव संदीप बगाडे,सदस्य अनंत भोसले,खजिनदार प्रतिभा भोसले तसेच महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी कपालिनी सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर लोंढे यांनी केले.
> “महिलांच्या हक्कांसाठी शासन, समाज आणि स्वयंसेवी संस्था यांचा संगम घडणे हेच खरी सामाजिक क्रांतीची सुरूवात आहे,”
— नंदिनी आवडे, सदस्य सचिव,राज्य महिला आयोग



