बालदिन जल्लोषात! नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आणि रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांचा उत्साही जल्लोष

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव 14 नोव्हेंबर — निरागसतेचा,आनंदाचा आणि बालसुलभ कल्पनाशक्तीचा उत्सव असणारा बालदिन नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साह, आनंद आणि हशांनी भरलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. “रडण्याचे काही कारण नव्हते आणि न हसण्याचे बहाने होते… का? आपण झालो इतके मोठे, यापेक्षा तर छान आपले बालपण होते!” या भावनिक ओळींनी कार्यक्रमाला सुंदर सुरुवात झाली.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत, कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. हा मान संस्थेचे संचालक श्री. संजय बागुल, उपाध्यक्ष सौ. सरिता बागुल आणि मुख्याध्यापिका मिस.वासंती नटराजन यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मिस. नेहा पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व सांगत नेहरूंचे मुलांवरील प्रेम आणि त्यांची दृष्टी प्रभावी शब्दांत उलगडून सांगितली. त्यानंतर रेनबो स्कूलच्या इयत्ता 1 ते 6 आणि लिटिल स्टार स्कूलच्या नर्सरी ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बालदिन या विषयावर सुंदर, आशयपूर्ण भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण होता—शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले मनोरंजक नृत्यप्रयोग. शिक्षकांच्या या अप्रतिम परफॉर्मन्सने संपूर्ण सभागृहातही टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर रेनबो स्कूलच्या 5वी-6वी आणि लिटिल स्टार स्कूलच्या 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांनी बालदिनावर आधारित सर्जनशील, रंगतदार नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साहाची भर घातली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटतर्फे बालदिनाच्या शुभेच्छा व स्वीट्स देण्यात आल्या. सूत्रसंचालनाची जबाबदारी मिस. नेहा पाटील आणि मिस. माधुरी भोसले यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टीमवर्कचा उत्कृष्ट नमुना सादर केला. दिवसभर शाळेचे परिसर हशा, आनंद व उत्साहाने उजळून निघाला.



