ताज्या घडामोडी

माय-बाप विठुराया आणि आषाढी एकादशी..!

गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा

– मधुकर भावे

आ1षाढी एकादशी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत सर्वात सात्विक दिवस कोणता…? मला आषाढी हाच दिवस वाटतो… आणि लहानपणही आठवते… त्यावेळी निसर्गचक्र आणि ऋतुचक्र फारसे बदलले नव्हते… ७ जूनला मृगाच्या धारा बरसायच्याच… आणि आषाढी एकादशीच्या आगोदर भात लावणीची सगळी कामे पूर्ण व्हायची… आमच्या रोहे गावात विठोबाचे एक छान मंदिर आहे. तिथे सप्ताह असायचा… आणि आम्ही त्यावेळची सगळी लहान­ मुले दिवसभर मंिदरात भजन ऐकत बसायचो… बाबुराव गोविलकर हे आम्हाला भजन म्हणायला सांगायचे ते आम्ही म्हणायचो… आषाढी एकादशी आली की, रोह्यातील विठोबाचे मंिदर डोळ्यांसमोर येते.. पुढे आषाढीला अनेकदा पंढरपूरला जायचा योग आला… बाळासाहेब भारदे मंिदर संस्थानचे अध्यक्ष असताना अनेकवेळा या सात्विक दिवशी विठुरायाच्या पायापर्यंत पोहोचता आले.

आजच्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भाग तर अगदी पावन झाल्यासारखा स्वत:ला समजतो… शहरात आषाढी केवळ ‘उपवासाचे पदार्थ खाण्यापुरती’ होते… पण, ग्रामीण भाग श्रद्धेवरच जागतोय… आणि ही श्रद्धा कुठेच तोलता येत नाही… आषाढीच्या आगोदर निघणाऱ्या दिंड्या-पालख्या…. पायी चालत जाणारे हजारो वारकरी… गळ्यात तुळशीची माळ घालून ‘ग्यानबा-तुकाराम’ गजर करीत भक्तीभावाने चालत जाणारी माणसं… डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून झपाझप चालणाऱ्या आमच्या लाखो भगिनी… जगात असे चित्र कुठल्याही देवस्थानाशी दर्शनासाठी दिसणार नाही. आषाढी म्हणजे आषाढीच… आणि हे सात्विक चित्र महाराष्ट्राच्या आत्मिक आणि भावनात्मक परंपरेचे फार मोठे प्रतिक… त्या दिवशी विठूरायाचे दर्शन घेण्याकरिता लागलेली ओढ… त्याला तोड नाही… दर्शन होओ…. न होओ… फक्त कळसाचे दर्शन घेवून शेकडो मैल चालत जाणारी माणसं.. वर्षभर जगण्याची शक्ती घेवून परतात… हा केवढा मोठा चमत्कार आहे… ही सगळी साधी-गरिब सश्रद्ध माणसं आहेत… अलिकडे मोटार गाड्या घेवून जाणारी आणि मनात श्रद्धा नसतानाही आपण विठोबाच्या दर्शनाला चाललोय, अशी बरीच आहेत… देखावा करणारी वेगळी आणि मनापासून जाणारी वेगळी… हजारो वर्षे ही वारीची परंपरा चालू आहे… आता शासनाने ही आषाढी जणू आपल्याच ताब्यात घेतली आहे. पण, सामान्य माणसाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही… विठूनामाचा गजर करीत हा माणूस चालतच जाणार आहे… आणि प्रचंड आत्मिक समाधान घेवून तो परतणार आहे… दुथडी भरलेली चंद्रभागा…. आणि त्या चंद्रभागेतील पुंडलिकाचे मंिदर…विठुरायाचे असे अनेक भक्त आपले कर्म नित्याचे करताना इतिहासाच्या पानात अमर झालेले आहेत. म्हणूनच महाराष्ट्राची संत परंपरा ही इतर राज्यात तुम्हाला कुठेच मिळणार नाही

… ‘ग्यानबा-तुकाराम’…. ग्यानबा म्हणजे ज्ञाानेश्वर महाराज हे १२०० व्या शतकातील… तुकोबा हे १६०० वर्षांतील… मध्ये ४०० वर्षांचा फरक… पण, या दोन महान तत्त्ववेत्यांना, सामान्य माणसांनीच ४०० वर्षांचा फरक एका क्षणात बाजूला करून, आपल्या नामोच्चारासाठी एकत्रित आणले… जगात असे उदाहरणच नाही… १८ पगड जातीतील हे संत विठुरायाचे भक्त आहेत. मडकी बडवणारा गोरा कुंभार… मडकी बनवता बनवता… भाजलेल्या मडक्याला हातातील चवलीने ठोकून… ‘मडके पक्के की कच्चे…’ आणि मग आपल्या डोक्यावर चवली ठोकून ‘हे मडके कच्चे की पक्के’ ही आत्मज्ञाानाची भाषा बोलू लागला…. सावता माळी… ‘बागेतील तण काढताना माझ्या मनात अविचाराचे किती तण आहेत…’ याचा विचार बोलू लागला… सेना महाराज अनेकांची डोकी साफ करताना माझ्या डोक्यात िकती मळ आहे, ही भाषा बोलू लागले… न शिकलेल्या या साध्या साध्या विठुभक्तांना हे झालेले ‘आत्मज्ञाान’ सामान्य माणसाला संता परंपरेच्या रांगेत घेवून गेले… ‘कर्म हाच ईश्वर…’हा संदेश पुढे गाडगेबाबांनी, तुकडोजी महाराजांनी या तमाम सामान्य माणसांना दिला…. गाडगेबाबा हे दर आषाढीला पंढरपूरला जायचे… पण मंिदरात ते कधी गेले नाहीत… कारण त्यांचा विठुराया सामान्य माणसांमध्ये होता.. म्हणून त्या दिवशी दर्शनाऐवजी याच विठुरायाच्या भक्तांना पाणी, अन्न देणारा आणि त्याची जागृती करणारा गाडगेबाबा हेही विठुरायाचाच अवतार होते… त्याच्याही पुढे जाऊन गाडगेबाबांनी अगदी जाहीरपणे सांगितले होते की, दिन-दलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आंबेडकर यांना आणि परदास्यातून मुक्ती देणाऱ्या गांधीजींना देव माना… त्यांच्या माणुसकीची पुजा करा… हा गाडगेबाबांचा संदेश होता…

आषाढीचे वैशिष्ठ्य हेच आहे की, हा महाराष्ट्राचा विठोबा ‘कानडा विठ्ठलु’ असला तरी महाराष्ट्रातील कर्मावर श्रद्धा असणाऱ्या सामान्य माणसांनी त्याला केवळ समोर मंिदरात बघितले नाही… तर आपल्या मनात त्याची जागा िनर्माण केली. म्हणून आषाढी हा दिवस कमालीचा सात्विक ठरला आणि हा विठुरायाही सामान्य माणसाला अापले सावलीसारखे रक्षण करणारा वाटू लागला. मग तो दामाजी पंतांनी सामान्य माणसांसाठी लुटलेल्या धान्याची कोठारांची रक्कम भरायला गेला… चोखोबाची गुरे राखायला गेला.. जनीच्या घरी भांडी घासायला गेला… आणि पंुडलिकाची भक्ती पाहून तो एवढा स्तिमित झाला की, पंुडलिकांनी फेकलेल्या विटेवर उभा राहिला… ‘मातृ-पितृ भक्तीला’ साक्षात विठुरायांनी नमस्कार केला असावा…

महाराष्ट्रातील संत परंपरेतील ही सगळी उदाहरणे आत्मज्ञाान निर्माण करून देणारी आहेत… जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आषाढीच्या दिवशी केलेल्या चिंतनातून मिळू शकतो, इतके या आषाढीचे सामर्थ्य आहे… विठुनामाच्या गजरामध्येही तेच सामर्थ्य आहे… विठोबा हा निव्वळ देव नाही… ‘अस्तिक’ ‘नास्तिक’ असे वाद भरपूर आहेत. देव आहेत की नाहीत यावरही वाद आहेत. पण, विठोबा असा देव आहे की, सामान्य माणूस त्याला ‘माय-बाप’ मानतो… जगात असे नाते कुठेच नाही…. त्यामुळे आषाढीच्या दिवशी त्याचे दर्शन घ्यायला लाखो माणसं अशी अनवाणी जावू शकतात, त्याची कल्पनाही करता येत नाही… पोटाला दिवसभर अन्न न मिळणारी माणसं दिवस-दिवस उपवास करून चालत आहेत…. आणि एका क्षणाच्या दर्शनाने आत्िमक सामर्थ्याने वर्षभर जगण्याची ताकद मिळवत परत येत आहेत. कोणत्या विज्ञाानाच्या व्याख्येत या भक्तीशास्त्राला बसवायचे…?
घरात बसून पंढरपूर आज डोळ्यांसमोर येते… आणि विठोबा आणि त्याच्या भजनात दंग झालेली ही सामान्य जनता… त्या जनतेची श्रद्धा-भक्ती आिण कर्मावरील निष्ठा… गळ्यातील तुळशीची माळ आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करणारा हाच माणूस… हीच या महाराष्ट्राची खरी शक्ती आहे. हीच खेड्यापाड्यांतील सामान्य माणसं वर्षभराचे आपले कष्ट प्रामाणिकपणे करत आहेत. श्रद्धेने जगत आहेत. चोरी-चहाडी करू नये… कोणाला वंगाळ बोलू नये… भलं असावं अन भलं दिसावं… या वृत्तीने ती आपले आयुष्य जगतात म्हणून खेडी विठूमय झाली… गावागावात अजून भजन परंपरा आहे. टाळ, झांज, चिपळा, मृदुंग आणि शांत रात्री भजनाचे स्वर ही ग्रामीण भागातील जीवनाची आजही फार मोठी साधना आहे… श्रद्ध्ने पर्वत हलू शकतात, हे त्याचमुळे म्हटले जाते. आषाढीचे ते सामर्थ्य आहे. दुसऱ्या अर्थाने पंढरीचा विठुराया हा खरा समाजवादी देव आहे… तिथे पैसेवाल्यांची गर्दी नाही… ज्यांनी विठ्ठलाचे नाम आयुष्यभर जपलेले आहे… मोत्याच्या माळेपेक्षा तुळशीची माळ पवित्र मानलेली आहे. म्हणून हा देव सामान्य माणसांचा देव आहे. मी ‘बालाजी’पेक्षा विठोबाला कितीतरी वेगळ्या अर्थाने पाहतो… आणि संत परंपरेतील साध्या-साध्या माणसांनी याच विठुरायाचा गजर केलेला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आतोनात आहे… सात्विक आणि आत्मिक समाधान देणारा हा दिवस आहे.
ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. ती तुळशीची माळ आणि आज सोन्याच्या जाड माळा गळ्यात घालून वावरणारे यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे… त्या सोन्याच्या माळा घालून, हातात सोन्याची कडी घालून राजकारणात धुडगूस घालणाऱ्यांपेक्षा तुळशीची माळ गळ्यात घातलेला हा आमचा सामान्य भक्त िकतीतरी उंचीवर आहे… कितीतरी सुसंस्कृत आहे…. तो शिकलेला नाही पण शहाणा आहे… शिवाय ही माळ प्रदर्शनाकरिता नाही… वारीसाठी आहे… वारी हे व्रत अाहे… गळ्यातील तुळशीची माळ तुटली तर लगेच दुसरी माळ गळ्यात घालता येत नाही… सात दिवस ती माळ ज्ञाानेश्वरी ग्रंथावर ठेवावी लागते… ७ दिवस उपवास करावा लागतो… एका अर्थाने ते तप आहे… आणि त्या श्रद्धेने गळ्यात घातलेली माळ सामान्य माणसाला नैतिकतेचा मोठा आधार देत असते… हा जो सामान्य माणूस आहे, तोच या देशाचा खरा आधार आहे.. त्याचे कष्ट आणि त्याचा प्रामाणिकपणा या जोरावरच हा देश आज काही आत्मिक आणि नैतिक ताकतीवर उभा आहे. नाहीतर आजच्या धिंगाण्यांच्या आणि धटींगणांच्या जगात सारी मूल्ये कोसळत असताना, आषाढीची गर्दी पाहिल्यानंतर ‘अजून सगळेच काही संपलेले नाही,’ याचा आत्मविश्वास पुन्हा मिळण्याचा हा दिवस आहे.
देव मानावा की मानू नये, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. पण एवढ्या प्रचंड विश्वाचा हा पसारा नियंत्रित करणारी एक आत्मिक शक्ती निश्चित कुठेतरी वावरते आहे. जिथं माणूस हतबल होतो… तिथं ही आत्मिक शक्ती काम करते… विनोबांनी गीता प्रवचनामध्ये एक छान उदाहरण दिले… झोपताना उशाला जी पुस्तके ठेवून झोपावे, त्यात तुकाेबांची गाथा असावी… तसेच विनोबांची गीता प्रवचने असावीत… एवढे त्यात आत्मिक सामर्थ्य आहे.. धुळ्याच्या तुरंगात विनोबाजी कैदी असताना १८ रविवार त्यांनी गितेतील १८ अध्यायांची मिमांसा केली. आणि ती प्रवचने लिहून घेणारे होते ते सानेगुरुजी. त्यात विनोबांनी एक छान उदाहरण दिले की, भूमितीच्या तासाला वर्गात भूमिती शिकवणारा
आध्यापक ‘अ’पासून ‘ब’पर्यंत अशी खडूने जाड रेषा काढतो… आणि ही ‘रेषा’ आहे, असे ‘माना’, असे सांगतो. ‘माना’ का? तोच प्रश्न विचारतो… आणि उत्तरही तोच देतो…. की ‘रेषेची व्याख्याच अशी आहे की, तिला जाडी नाही…’ विनोबा सहजणपे सांगून जातात की, ‘भूमिती शास्त्रात जे नाही त्याला माना…. असे सांगण्याची मुभा असेल तर आमच्या भक्तीशास्त्रात यात आत्मिक शक्तीत देव आहे असे माना… यात काय चुकीचे?’ विनोबांची ती सगळी प्रवचने िकतीही वेळा वाचली तरी एक वेगळी अनुभूतीच वाचक जगत असतो…
विठुरायाचेही असेच आहे.
हा महाराष्ट्राचा सर्वात लडका देव आहे. त्याहीपेक्षा सखा-मित्र-मायबाप आहे. त्यामुळे अनेग गितांमध्ये विठुरायाला माय-बाप संबांधलेले आहे.
अशा या विठुरायाच्या दर्शनासाठी आज आषाढीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावरच्या या आमच्या भक्ताला विठाेबाएवढीच शक्ती मिळते… आणि म्हणूनच सश्रद्ध ग्रामीण भाग जो पंढरपूरला पोहचू शकत नाही… ते नागरिक पंढरपूरहून दर्शन करून आलेल्या माणसांच्या पाया पडतात, ही भावना किती उच्च दर्जाची आहे… भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक संदर्भ आहेत… की त्यात धार्मिक उन्माद अजिबात नाही. जगात हा एकमेव देश असा अाहे की, आपला पाय चुकून कोणाला लागला तरी आपण ‘sorry’ म्हणत नाही… नमस्कार करतो… जगात सर्व देशांत ‘sorry’ म्हटले जाते… ‘sorry’ आिण ‘नमस्कार’ यातील फरक म्हणजे भारतीय संस्कृतीचा फरक आहे… आणि हा फरक ग्रामीण भागात अाजही टिकून आहे. उद्धवस्त होत चाललेल्या खेड्यांतील प्रत्येक माणूस आपले दारिद्र्य भूक-तहान आणि उद्याचे भविष्य हे सगळे विसरून एक दिवस तरी विठुरायाच्या एवढा लीन झालेला आहे. असे चित्र जगात कुठेही पहायला मिळणार नाही…
आज सहज आठवले… ‘उजनी’ धरणाच्या भूमिपूजनाला यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या सोबत जाण्याची परम भाग्याची संधी मिळाली. ‘उजनी’ला जाण्याअगोदर चव्हाणसाहेब म्हणाले, पंढरपूरला जायला पाहिजेल आहे…. विठुरायाची भीमा-चंद्रभागा आपण आडवलेली आहे… त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागितली पाहिजे…’ ते वाक्य ऐकल्यावर या नेत्याच्या मनाची, संस्काराची आणि िवचारांची दिशा किती उच्च दर्जाची आहे, याची जाणीव तीव्रपणे झाली. त्यामुळे महाराष्ट्राची बांधणी करताना यशवंतरावांनी जो विचार केला… तो सामान्य माणसांचाच विचार होता… त्या विचारांपासून आपण खूप लांब निघून गेलो आहोत. असे जाणवणाराही आजचा दिवस आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.