नांदगाव मतदार संघातुन कोणला मिळणार उमेदवारी ? कोण होणार आमदार ?
उमेदवाराबाबत मतदार संघात लागली उत्सुकता : विधानसभेसाठी सर्वच पक्षांच्या मोर्चेबांधणीला आला वेग
गर्जा महाराष्ट्र २४ न्यूज वृत्तसेवा
नांदगाव, ता. २१ :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव मतदार संघातील राजकीय वातावरण पक्षीय पातळीवर इच्छुकांच्या मोर्चेबांधणी च्या उलटसुलट चर्चेमुळे आता हळूहळू तापू लागले आहे. महायुती महाविकास बहुजन वंचित आघाडी व व अन्य इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला म्हणावा तसा वेग आला नसला तरी चाचपणी म्हणून केवळ अनेक नावांची चर्चा त्यातून उमटणारे पडसाद मात्र यामुळे राजकीय धुराळा उठण्यास निमित्त ठरला आहे.
महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान सुहास कांदे यांनाच पुन्हा चाल दिली जाणार असल्याच्या चर्चेने ते निर्धास्त आहे. मंत्री छगन भुजबळ समर्थकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा राजकीय पातळीवर केंद्रस्थानी आणून ठेवली आहे.त्यामुळे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ऐवजी समीर भुजबळ यांच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
शिवसृष्टीच्या लोकार्पण निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील पंधरवड्यात नांदगाव दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्व आले आहे. विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या नांदगाव दौऱ्यात शिक्कामोर्तब होईल का याकडे लक्ष लागून आहे. महाविकास आघाडीकडून इच्छुक दावेदारी तिघाही पक्षाकडून होत असताना महा विकास आघाडीतर्फे नेमके कोण याबद्दलची उत्सुकता कायम असतांना महायुतीकडून समीर भुजबळ वगळता इतर फारसे कुणी दावेदार पुढे आलेले नाही. हा आमदार सुहास कांदे याना दिलासा आहे व ती त्यांची जमेची बाजू दिसत आहे महाविकास आघाडी महायुती यांच्या शिवाय अन्य इच्छुकांची संख्या जशी निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा हे चित्र अधिक स्पष्ट होईल. लोकसभा असो कि विधानसभा निवडणूक यात बहुजन वंचित आघाडीची भूमिका ही कायम निर्णायक ठरलेली आहे त्यामुळे यंदाचा वंचितकडून होणारा प्रयोग दखलपात्र असणार हे देखील निश्चित असणार आहे याशिवाय बहुजन वंचित आघाडी कडून नावाची घोषणा बाकी आहे वंचित फॅक्टरची निर्णयक मते ही वंचितची जमेची बाजू आहे.
अश्विनी आहेर यांची चर्चा
महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून गणेश धात्रक यांनी प्रबळ उमेदवार म्हणून भरपूर तयारी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून बाजीराव शिंदे, महेंद्र बोरसे या इच्छुकांच्या नावांची चर्चाही राजकीय वळण देणारी आहे. काँग्रेसला त्यांची हक्काची जागा म्हणून नांदगावची जागा मिळावी, अशी मागणी पुढे आली आहे. त्यामुळे माजी आमदार अॅड. अनिल आहेर, त्यांच्या कन्या अश्विनी आहेर हे महाविकास आघाडीकडून संभाव्य इच्छुक आहेत.



