ऑनलाईनसोबत आता ऑफलाइनही नामांकन स्वीकार — राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय”
नगरपरीषद निवडणुका 2025 : ऑनलाईन प्रणालीत अडचणी; आयोगाचा निर्णय — 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईनसोबत ऑफलाइनही नामांकन स्वीकार

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
मुंबई ता:14 राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 संदर्भातील महत्त्वाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. ऑनलाईन नामनिर्देशन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारींनंतर उमेदवारांना समान संधी देण्यासाठी आयोगाने तीन दिवस ऑफलाइन नामांकन स्वीकारण्याची परवानगी दिली आहे.
४ नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामांकन ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. मात्र, प्रणालीवर वाढलेला ताण आणि तांत्रिक अडथळे लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. नामांकन सादर करण्यासाठी आता फक्त दोन दिवसच शिल्लक असल्याने आयोगाने तत्काळ हस्तक्षेप करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार —
“दि. 15 नोव्हेंबर 2025 ते दि. 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत (16 नोव्हेंबर, रविवार — सार्वजनिक सुट्टी असूनही), दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईनसोबतच पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने देखील नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करता येतील.”
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित स्तरावरून तातडीने सूचना निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सचिव सुरेश काकांणी यांनी पत्र जारी केले.



