घटनाविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नांदगाव तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन
सरकारकडून लोकशाहीची गळचेपी – संतोष गुप्ता

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव (ता. 10 सप्टेंबर) – नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या व घटनाविरोधी असलेल्या जनसुरक्षा कायद्याचा निषेध करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नांदगाव तालुका शाखेतर्फे आज नांदगाव तहसील कार्यालयावर जनआंदोलन करण्यात आले.
या कायद्याच्या विरोधात संतोष गुप्ता (तालुकाप्रमुख, शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनी सांगितले की,“राज्य सरकारने विधानसभेमध्ये बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा कायदा मंजूर केला.या कायद्यामुळे सरकार कोणत्याही व्यक्तीला थेट तुरुंगात डांबू शकते.हा कायदा व्यक्तिस्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मूल्यांना बाधा आणणारा आहे.सरकार विरोधकांवर,नागरिकांवर आणि राजकीय कार्यकर्त्यांवर एकतर्फी कारवाई करून त्यांना दडपण्याचे काम या कायद्याच्या आडून करत आहे.”
कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी
शिवसेना ठाकरे गटाने हा कायदा त्वरित रद्द करून नागरिकांना जाचक व्यवस्थेपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे.अन्यथा,शासनाविरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.