“ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा” – महेंद्र बोरसे यांची मागणी

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. 04 : राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून, अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे नांदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअल २०१७ मध्ये ओल्या दुष्काळाबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला. केंद्राचं पथक अद्याप राज्यात पाहणीसाठी आलेलं नाही,ही बाब केंद्र सरकारच्या उदासीनतेचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले.
केंद्र-राज्य निधीचे वास्तव
राज्यातील नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी NDRF आणि SDRF अंतर्गत निधी दिला जातो. यामध्ये केंद्र सरकार ७५ टक्के तर राज्य सरकार २५ टक्के हिस्सा उचलते. SDRF च्या मदतीच्या दरात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. मात्र, ३० मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०२५ मध्ये नुकसान भरपाईची रक्कम कमी करण्यात आली असून, कमाल तीन हेक्टरऐवजी फक्त दोन हेक्टरपर्यंतच मदत दिली जाणार आहे, असा आरोप बोरसे यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची मागणी
“राज्यावर ओढवलेल्या गंभीर संकटात केंद्राने जास्तीत जास्त मदत करणे अपेक्षित होते. परंतु केंद्राने राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा केवळ आगाऊ स्वरूपात दिला असून, प्रत्यक्ष मदतीची कोणतीही भरीव घोषणा केलेली नाही,”असे बोरसे म्हणाले. या जीएसटी रक्कमेमध्ये महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपये मिळाले असून, ही रक्कम शेतकरी, शिक्षण, आरोग्य व सार्वजनिक योजनांमध्ये वापरली जाऊ शकते. पण प्रत्यक्ष शेतकऱ्याला किती दिलासा मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओल्या दुष्काळाची मदत अधिक व्यापक
सध्या फक्त दोन हेक्टरपर्यंतच प्रति हेक्टरी ८५०० रुपये इतकीच मदत दिली जात आहे. मात्र,जर ओला दुष्काळ जाहीर झाला, तर त्याअंतर्गत कर्जमाफी, कर्ज फेडीला मुदतवाढ, पिकविमा, जमीन महसुलातून सूट, वीज बिल माफी, शैक्षणिक शुल्क माफी, रोजगार हमी योजनेत काम, चारा छावण्या, मोफत अन्नधान्य, आरोग्य शिबिरे आदी स्वरूपात अधिक व्यापक मदत मिळू शकते.
सरकारच्या उदासीनतेचा आरोप
“सरकार फक्त कागदोपत्री काम करत आहे.प्रत्यक्षात शेतकऱ्याला दिलासा मिळेल,अशी कोणतीही ठोस कृती अजून झालेली नाही.त्यामुळे सरकारने तात्काळ विशेष पॅकेज जाहीर करून,अटी-शर्थी न लावता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी लागू करावी,ही आमची ठाम मागणी आहे,” असे श्री बोरसे यांनी स्पष्ट केले.