महाराष्ट्र

पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगांव ता.२६ राज्यातील वातावरणात दिवसेंदिवस
बदल होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे.दरम्यान,भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस २६ ते २८ नोव्हेंबरमध्ये राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या भागात जोरदार पावसाचा इशारा…..

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज 2 मध्ये असून तो माघारी फिरुन 6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

मुंबईसह ठाण्यातही पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातही जोरदार पावसाती शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस रब्बीतील ज्वारी, हरबरा पिकांना वरदान ठरण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक जाणवते, त्यामुळं थंडीता कडाका कमी होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.