नांदगाव तालुक्यात सेवा पंधरवडा तीन टप्प्यांमध्ये साजरा होणार – तहसिलदार सुनिल सौंदाणे

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता. 16 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (17 सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर) सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम नांदगाव तालुक्यात तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून,विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुनिल सौंदाणे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात,सर्व गावांमध्ये शिवार फेरी घेऊन शिव पानंद रस्त्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्यात येणार आहे.यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात,पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे वाटप करण्यात येणार असून,अतिक्रमण नियमानुसार हटविण्यात येणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यात,स्मशानभूमीच्या जागेचा ताबा देणे,रेशन कार्ड,आयुष्मान भारत कार्ड तयार करणे,संजय गांधी योजनेचा लाभ,स्वच्छता मोहीम आणि पोटखराबा प्रकरणे लागवडीखाली आणण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे.तहसीलदार सुनिल सौंदाणे यांनी नागरिकांना आवाहन केले की,या उपक्रमात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा