पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नांदगावमध्ये आदिवासी मुलांच्या हस्ते केक कापून अनोखा उत्सव

गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज
नांदगाव (प्रतिनिधी) ता. 19 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात गोरगरीब,वंचित आणि सामान्य जनतेला सशक्त करत आत्मनिर्भर भारताची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली असून,”सबका साथ, सबका विकास” या मंत्राला व्यवहारात आणले आहे, असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) नांदगाव शहरात “जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव” यांच्या वतीने सामाजिकतेचा आणि जनसंपर्काचा आदर्श ठेवून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात आदिवासी मुलांच्या हस्ते केक कापून मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवणारा एक सामाजिक संदेश देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य जगन्नाथ साळुंखे होते.त्यांनी आपल्या भाषणात मोदींनी देशासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत,विशेषतः गरीब कल्याण योजना,जनधन योजना, उज्वला योजना,पीएम किसान सन्मान निधी यांसारख्या अनेक योजनांचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जायंट्स ग्रुप ऑफ नांदगावचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने यांनी केले.त्यांनी ग्रुपच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आणि पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रेरणेतूनच अशा विधायक उपक्रमांना चालना मिळते,असे नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थितांना केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सचिव प्रसाद बुरकुल यांनी सविस्तरपणे दिली. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना,अटल पेंशन योजना,मुद्रा योजना यासारख्या योजनांचा विशेष उल्लेख होता.
या कार्यक्रमाचे संयोजन राजकुमार संत यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी फेडरेशन ऑफिसर सुमित गुप्ता यांनी सर्व उपस्थितांचे, विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व नागरिकांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. या वेळी नांदगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, तरुण मंडळाचे सदस्य, महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आदिवासी मुलांचा सहभाग हा या उपक्रमाचा खास आकर्षण बिंदू ठरला.सामाजिक सलोखा, समरसता आणि लोकसंपर्क वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.



