ताज्या घडामोडी

पीकविम्याचा लाभ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळू द्या :- राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांची मागणी

तालुक्यातील सर्वच मंडळातील दावे सरसकट पात्र ठरवा

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा

नांदगाव ता.११ सध्या तालुक्यातील दुष्काळसदृशता परिस्थिती लक्षात घेता हंगामातील प्रतिकूल परिस्थितींतर्गत तालुक्यातील सर्व महसूल मंडळांचा समावेश करून प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ अंतर्गत
दाखल करण्यात येणारे दावे सरसकट पात्र ठरवावेत,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी मंगळवारी (ता. १०) तहसीलदार डॉ सिद्धार्थकुमार मोरे यांच्याकडे केली आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून पंचवीस टक्क्याची अग्रिम जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केली आहे.ही अग्रीम रक्कम अद्यापही मिळत नसल्याने रब्बीच्या हंगामाला सामोरे कसे जावे असा प्रश्न उभा राहिला आहे.सुधारित मार्गदर्शनानुसार सर्व प्रातिनिधिक सूचकांक विचारात घेतलेले नाहीत.
अनुसूचित हानीची सव्र्व्हेक्षण प्रक्रिया नोंद नीट राबविली नाही असा आक्षेप घेत दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने हरकत घेतल्याने शेतकऱ्यांना विम्याची अग्रीम मिळण्यास अडथळा उभा राहिला आहे याकडे .महेंद्र बोरसे यांनी लक्ष वेधले आहे.पिकांची प्रत्यक्ष कापणी झाल्यावर उत्पादनात येणारी घट आणि होणारे नुकसान याबाबत विमा कंपनीकडून पीकविमा अर्जाच्या छाननीत अनियमितता आणि बनावटपणा दिसून येत असल्याबद्दलचा आक्षेप विमा कंपनीने नोंदवला आहे.असे करतांना राज्य शासनाकडून विमा कंपनीस शेतकरी प्रीमियम मधील एक रुपया वजा जाता उर्वरीत रक्कम मिळालेली नाही,असे उलट टपाली सांगितल्याने विमा कधी मिळणार असा संभ्रम निर्माण होऊन शेतकऱ्यांत मोठा असंतोष खदखदत असल्याचे या निवेदनात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

कृषी विभागास सूचना देण्यात यावी…..

पीकविमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्वानुसार वेगवेगळ्या रोगांवरील कारणामुळे बाधित पीकविमा दावे नामंजूर केले जातात, परंतु जर कृषी विभागाने या रोगांचे सर्व्हेक्षण करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला असेल तर दावे मंजूर होण्यास कायदेशीर आधार मिळतो. सबब अशा प्रकारे सव्र्व्हेक्षण अहवाल कृषि विभागामार्फत शासनास सादर करून रोगांमुळे बाधित होणारे दावे मंजूर करण्यासाठी उपाययोजना करावी. पीकविमा मंजुरीसाठी केलेल्या दाव्यांचा कालावधी हा वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा व पीक स्थितीनुसार म्हणजेच पिकपेरणी ते पिक कापणी व कापणी पश्चात नुकसान असा असतो, त्यामुळे तालुक्यातील भीषण परिस्थिती बघता सर्व शेतकरी वेगवेगळ्या टप्प्यात निश्चितच भरपाईसाठी पात्र ठरत असल्याने आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणांना उचित आदेश पारित करण्याची मागणीही या निवेदनात देण्यात आली आहे

दृष्टिक्षेप….

वाढीव भरपाईसाठी योग्य कार्यवाही करा
संपूर्ण हंगामात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस नोंद या निकषानुसार परिस्थिती प्रतिकूल ग्राह्य धरून तो विभाग पीकविमा मिळण्यासाठी पात्र समजला जातो. त्यानुसार वरील सर्व बाबी नांदगाव तालुक्यास लागू असल्याने तालुका २५ टक्के अग्रीम भरपाईसाठी पात्र असला,तरी भविष्यातील वाढीव भरपाईकरिता योग्य उपाययोजना व त्यासाठी अपेक्षित जनजागृती तहसीलदारांनी आपल्या स्तरावरून होण्याकामी व संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यास उचित कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.