कांदा निर्यातबंदीचा फेरविचार करावा : ना.डॉ.भारतीताई पवार
केंद्रीय वाणिज्यमंत्री गोयल यांना पत्र

गर्जा महाराष्ट्र24 न्यूजवृतसेवा
नाशिक, ता. ९ : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्का दिल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.केंद्रीय आरोग्य आणि जनजाती राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत त्यांना कांदा निर्यातबंदीबाबत फेरविचार करण्यात यावा,अशी मागणी केली आहे.याबाबतचे पत्रही त्यांना दिल्याची माहिती मंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी दिली.
केंद्रीय आदिवासी जनजाती राज्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर डॉ. पवार यांचे शनिवारी (ता. ९) नाशिक येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या म्हणाल्या,की मी शेतकऱ्यांबरोबर आहे.याबाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.निवडणुकीचा आणि या निर्यातबंदीचा संबंध नाही,असे म्हणत त्यांनी निवडणुका – आल्यावर कांद्याचा प्रश्न उभा राहतो,हा आरोप फेटाळला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कांदा प्रश्नावर चांदवड येथे आंदोलन करणार आहेत. याबाबत विचारणा केली असता,डॉ.भारतीताई पवार यांनी याबाबत राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धोरण सर्वांनी अवलंबले पाहिजे.भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ,मनोज बेलदार,स्वीय सचिव प्रवीण रौंदळ,सुनील बच्छाव,नितीन गायकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



