गंगाधरीच्या मेंढपाळाचा मुलगा झाला फौजदार

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा
नांदगाव ता.८: संघर्ष, जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर गंगाधरी (ता. नांदगाव) येथील मेंढपाळांच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई,वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.हृषीकेश वाल्मीक कर्नर असे या मुलाचे नाव आहे.नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या गंगाधरी येथील तळेवस्ती येथे राहणाऱ्या हृषीकेश कर्नर याने वस्तीशाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा केला.त्यानंतर नांदगाव येथून माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.यादरम्यान तो आई,वडिलांना शेतीची कामे व मेंढपाळ करत असे वडील मेंढपाळ असल्याने वाड्यावरील कामातही तो मदत करत असे. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेताना त्याने कुठलीही शिकवणी लावली नाही. त्यानंतर त्याने फौजदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. यासाठी त्याने छत्रपती संभाजीनगरला जाऊन अभ्यास केला. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आलात हे महत्त्वाचे नसते तर आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत उपलब्ध साधनाचा उपयोग करून जीवनात यश मिळविता येते.माझ्याकडे हे नाही ते नाही असे न म्हणता फक्त मेहनतीच्या बळावर असाध्य ते साध्य करता येते याचा प्रत्यय ऋषीकेशने आणून देत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.यासाठी त्याला आजोबा त्र्यंबक कर्नर,वडील वाल्मीक कर्नर,आई,आजी,शिक्षक या सर्वांचे पाठबळ मिळाले.मेंढपाळ चा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्याने ऋषिकेश याचे तालुक्यात कौतुक होत आहे



