ताज्या घडामोडी

भूमिअभिलेख कार्यालयास शेतकऱ्यांनी लावले कुलूप

नांदगाव येथील घटना; तहसीलदारांची मध्यस्थी

गर्जा महाराष्ट्र24न्यूज वृत्तसेवा

नाशिक (नांदगाव ) ता. १२ तालुका अभिलेख कार्यालयाने मोजणीसाठी तारीख दिल्यानंतरही मोजणी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१२) सायंकाळी तालुका भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकत अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात कोंडून आंदोलन केले.तहसीलदार डॉ. सिद्धार्थकुमार मोरे,पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मध्यस्थीनंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हिसवळ (ता.नांदगाव) खुर्द येथील शेतकरी व बाजार समितीचे माजी उपसभापती राजाभाऊ देशमुख यांच्या मांडवड शिवारातील ७८९ च्या मोजणीसाठी येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे सहा महिन्यापूर्वी रीतसर अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु सहा महिन्यात केवळ तारखा देऊन उत्तर दिले. मोजणी करण्यास टाळाटाळ केली जात होती. सोमवारी राजाभाऊ देशमुख यांना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सकाळी नऊला नंतर दुपारी बाराला नंतर दुपारी तीनला मोजणी करू असे सांगितले. त्यानंतर कार्यालयीन वेळ संपली नंतर प्रत्यक्षात स्थळ बघू असे सांगितले.जमीन मोजणीसाठी सतत टाळाटाळ केली जात असल्याने अखेरी श्री. देशमुख त्यांच्या सोबतचे ग्रामस्थ संतप्त झाले.यावेळी उपस्थितीत तालुका उपअधीक्षक योजना अकोलकर यांनी मनुष्यबळ कमी असल्याचे सांगत आपली हतबलता श्री. देशमुख यांच्याकडे व्यक्त केली.मात्र संतप्त देशमुख व सहकाऱ्यांनी जोवर तुम्ही नेटका खुलासा करीत नाही तोवर तुम्हाला कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही असे सांगत कार्यालयाचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.
घटनेची माहिती कळताच तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे,पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्यासह जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष प्रमोद भाबड, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव,डॉ.सुनील तुसे,सागर हिरे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कवडे,माजी नगरसेवक नंदू पाटील,नूतन कासलीवाल,कपिल तेलुरे आदी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे धाव घेतली.तहसीलदार श्री.मोरे यांनी श्री. देशमुख यांच्यासह अन्य मंडळींची समजूत काढली येत्या तीन दिवसात तहसीलदारांच्या दालनात भूमी अभिलेख विभागातील तीन व तक्रारदार यांचे तीन प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचे सांगितले.यावर श्री. देशमुख व संतप्त शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.यानंतर कार्यालयात असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सुटका झाली.

★★★★★★

कार्यालयात मनमानी कारभार

■ येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नसून या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.त्याचा उद्रेक आज झाला. तालुका भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीची मोजणी तसेच सिटी सर्व्हे उतारे, गट एकत्रीकरण उतारे, यासह शेतजमिनीशी संबंधित अनेक दस्तऐवज मिळणे कामी दुर्गम भागातून खेड्यापाड्यातील नागरिकांना कायम चकरा माराव्या लागतात.भूमिअभिलेख कार्यालयात गेल्या अनेक दिवसापासून मोजणीसह नागरिकांना स्थावर मिळकतीचे उतारे मिळण्यास विलंब होत असून दप्तर दिरंगाई वाढली असल्याचा आरोप उपस्थितांनी केला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.